Israel–Hamas war – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. जागतिक न्यायालयाने इस्रायलला गाझा पट्टीमध्ये हल्ल्यामुळे झालेल्या मृत्यू आणि नुकसानीचा संपूर्ण हिशोब द्यावा आणि यापुढे कोणतीही गंभीर दुखापत किंवा नुकसान टाळण्यासाठी सांगितले आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, इस्रायलने गाझामध्ये आपल्या सैन्याने नरसंहार करणार नाही याची खात्री करावी आणि तेथील मानवतावादी परिस्थिती सुधारण्यासाठी सुधारात्मक पावले उचलावीत. यासोबतच न्यायालयाने इस्रायलला एका महिन्यात या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर गाझा पट्टीतील नरसंहाराचा आरोप करत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. खरं तर, दक्षिण आफ्रिकेने न्यायालयाला विनंती केली होती की इस्त्रायली लष्करी कारवाया लवकरात लवकर संपवण्याचे आदेश द्यावेत. ICJ अध्यक्ष म्हणाले की, खरेतर न्यायालय गाझामध्ये घडणाऱ्या मानवतावादी हानीबद्दल जागरूक आहे आणि गाझामध्ये मारल्या जाणाऱ्या लोकांबद्दल काळजीत आहे.
ICJ च्या निर्णयावर इस्रायलचे पंतप्रधान काय म्हणाले?
ICJ च्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नरसंहार प्रकरण आक्षेपार्ह असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी सर्व शक्य पावले उचलत राहील.
यापूर्वी न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान दक्षिण आफ्रिकेने गाझामधील इस्रायलच्या कारवाईने नरसंहार कराराचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेने सांगितले की, हमासने इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये कहर केला आहे. मात्र, इस्रायलने नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले असून हे आरोप रद्द करण्याची मागणी न्यायालयाला केली आहे.
इस्रायल आणि हमासचे युद्ध कसे सुरू झाले?
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलवर काही वेळात पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. त्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली होती. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात 25 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा आहे. तर शेकडो इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत.