निर्माता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याने “लगान’ आणि “स्वदेस’ हे दोन अतिभव्य चित्रपट दिले. अतिभव्य हे गुणात्मकदृष्ट्या आहे. या दोन्ही चित्रपटांची कमाई हा विषय नगण्य. मात्र हिंदीतील मोजक्या चांगल्या चित्रपटांची जेव्हा चर्चा केली जाईल तेव्हा या दोन चित्रपटांच्या उल्लेखाशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही.
या दोन चित्रपटांबाबतीत एक योगायोग. तो म्हणजे या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या व नंतर भारतभर लोकप्रिय झालेल्या त्यांच्या नायिका. लगानची ग्रेसी सिंग आणि स्वदेसची गायत्री जोशी. पहिल्या भव्य यशानंतर या दोघी गायबच झाल्या. ग्रेसीने काही फुटकळ चित्रपट केले. मात्र, मुन्नाभाई एमबीबीएस हा आणखी एक सुपरहिट चित्रपट तिच्या खात्यावर जमा झाला. गायत्री पहिल्या चित्रपटानंतर अशी गायब झाली जणू ती या ग्रहावरची नव्हतीच.
मात्र, नुकताच इंटरनेटवर एक फोटो झळकला आहे. त्यात सोनाली बेंद्रे आणि हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुजान यांच्यासोबत गायत्रीही अत्यंत स्टायलीश लूकमध्ये दिसते आहे. त्या व्यतिरिक्त फारशी माहिती येथे नाही. मात्र, गायत्रीबाबत थोडी माहिती पुढीलप्रमाणे. तिने 2005 मध्ये विकास ओबेरॉय नामक उद्योगपतीशी लग्न केले.
विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रिऍलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलची निर्मिती याच ग्रुपने केली आहे. गायत्री पतीला या व्यवसायात मदत करते असे सांगितले जाते. स्वदेसच्या अगोदर गायत्रीने सॅंट्रो की कोणत्यातरी कारची जाहिरात शाहरूखसोबत केली होती. त्यानंतर ती दोन म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. स्वदेस आला आणि ती गायबच झाली.