पुणे : मुळशी तालुक्यातील गोड आणि रसाळ गावरान हापूसची आवक मार्केट यार्डमधील फळबाजारात सुरू झाली आहे. चक्रीवादळाचा गावरान हापूसला मोठा फटका बसला असून फळांचे नुकसान झाले आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील फळबाजारात शुक्रवारी (२१ मे) गावरान हापूसचे अकरा क्रेट्स (प्लास्टिक जाळी) मुळशी तालुक्यातील बेलावडे गावातून विक्रीसाठी पाठविण्यात आले. घाऊक बाजारात गावरान हापूसची प्रति डझन २५० रुपये आणि पायरीची २०० रुपये डझन या भावाने विक्री करण्यात आली. गावरान हापूस नैसर्गिकरीत्या पिकवण्यात आलेला असतो.
त्यामुळे त्याची गोडीही चांगली असते. वटपौर्णिमेला पूजनासाठी गावरान हापूसला चांगली मागणी असते, अशी माहिती गावरान हापूसचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळामुळे गावरान हापूसचे मोठे नुकसान झाले आहे. गावरान हापूसची लागवड मुळशी, भोर आणि वेल्हा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात.
गावरान हापूसची हंगामातील पहिलीच आवक शुक्रवारी बाजारात झाली. किरकोळ बाजारात एक डझन गावरान हापूसला ४०० रुपये आणि पायरीला ३०० रुपये असा भाव मिळाला आहे, असे कोंडे यांनी सांगितले.
यंदा निम्मीच आवक होण्याची शक्यता?
पंधरा मे नंतर गावरान हापूसची आवक बाजारात सुरू होते. २५ जूनपर्यंत बाजारात गावरान हापूसची आवक सुरू होते. चार दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे झाडावर लगडलेल्या फळांचे नुकसान झाले आहे.
जवळपास पन्नास टक्के फळे खराब झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गावरान हापूसची अपेक्षेएवढी आवक होणार नाही. निम्मीच आवक होण्याचा अंदाज यशवंत कोंडे यांनी वर्तविला आहे.