मुंबई – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे., महिला आयोगाने याची दखल घेत काही महत्वाचे आदेश देखील दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.
“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे” अशी माहिती रुपाली चाकणार यांनी दिली. आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात,”लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.”
“एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील.” अशा आशयाचे ट्विट आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. २/३
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
नेमकं प्रकरण काय ?
अवघ्या महाराष्ट्रभर चर्चित असलेली आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडणारी लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत रीतसर तक्रार देखील करण्यात आली आहे. हा व्हिडीओ नेमका याच नृत्यांगनांचा आहे का ? हा व्हिडीओ नेमका केव्हा टाकण्यात आला ? याबाततची अधिकृती माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.