नवी दिल्ली – प्रशिक्षकाकडून कोडवर्डमध्ये संदेश प्राप्त करणे कदाचित क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन नसेलही, मात्र ही कृती आपल्या प्रतिमेला मारक आहे. त्यामुळे जर असे कृत्य माझ्याकडून घडले असते तर मी तत्काळ कर्णधारपदाचा राजीनामा दिला असता, अशा शब्दांत कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) माजी कर्णधार गौतम गंभीरने सध्याचा कर्णधार इयान मॉर्गन याच्यावर टीका केली आहे.
केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यातील सामन्यादरम्यान केकआरचा कर्णधार ईयान मॉर्गनला संघाचे विश्लेषक असलेल्या नॅथन लीमनने एक खास कोडवर्ड संदेश पाठवला होता.
सामना सुरू असतानाच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला अशाप्रकारे फारच क्वचितप्रसंगी संदेश पाठवला जातो. त्यामुळेच या प्रकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, याच मुद्द्यावरून गंभीरने मॉर्गनला खोचक ताशेरे ओढले आहेत. जर मी कर्णधार असतो व माझ्याकडून हे घडले असते तर मी तत्काळ पद सोडले असते, असे गंभीर म्हणाला.
या सामन्यात सीएसकेने केकेआरवर दोन गडी राखून विजय मिळवला. 10 सामन्यांत या आठव्या विजयासह सीएसकेने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर दुसरीकडे केकेआरसाठी हा स्पर्धेमधील सहावा पराभव ठरला. यंदाच्या स्पर्धेत केकेआरला सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यांना 10 पैकी 6 सामने गमावावे लागले आहेत.