नवी दिल्ली – राजस्थानमधील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना १ जानेवारीपासून ४५० रूपयांत गॅस सिलिंडर उपलब्ध होतील. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केलेल्या त्या घोषणेमुळे भाजपच्या आश्वासनाची पूर्तता होणार आहे.
राजस्थानात मागील कॉंग्रेस सरकारने उज्ज्वला लाभार्थींना ५०० रूपयांत गॅस सिलिंडर दिले. आता नव्या भाजप सरकारच्या निर्णयामुळे त्या लाभार्थींना आणखी ५० रूपये कमी दरात गॅस सिलिंडर मिळतील. संबंधित रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल.
त्यासाठीच्या अनुदानाचा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार आहे. राजस्थानात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपने जनतेला विविध आश्वासने दिली. त्यामध्ये गॅस सिलिंडरशी संबंधित आश्वासनाचाही समावेश होता. त्या निवडणुकीत बाजी मारत भाजपने राजस्थानमध्ये सरकार स्थापन केले.
आता नवे मुख्यमंत्री शर्मा यांनी पक्षाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या आधारे जनतेची सेवा करण्यास आमचे सरकार वचनबद्ध आहे, असे शर्मांनी म्हटले आहे.