गढवा – झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील रंका येथे हत्तींनी हैदोस घातला असून त्याच्यामुळे प्रचंड नुकसानही होते आहे. शनिवारी हत्तींच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात झोपेत असलेल्या एक महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात गावातील चार घरे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी रस्त्यावर येत निदर्शने केली. संतप्त जमावाने तब्बल दोन तास झारखंड आणि छत्तीसगढला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत घातल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. हत्तींमुळे ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई दिली जाण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
रंका येथील घटनेत १० जंगली हत्तींच्या कळपाने पहाटे तीन ते चारच्या सुमारास हल्ला केला. त्यांच्या दहशतीने नागरिकांची धावाधाव सुरू झाली. त्यात ममता शर्मा नावाची महिला झोपली असताना हत्तीच्या पायाखाली चिरडली गेली तर तिची मुलगी सपना शर्मा गंभीर जखमी झाली.
ममताचा जागेवरच मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर कळप पुन्हा जंगलाच्या दिशेने परत गेला. झारखंडमध्ये गेल्या काही काळापासून हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष असाच सुरू असून आतापर्यंत हत्तींच्या हल्ल्यात १० ते १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर वेगवेगळ्या घटनांमध्ये दहा हत्तींनाही ठार करण्यात आले आहे.