IND vs SA Test 2n Day Highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अनुभवी फलंदाज डीन एल्गरने दमदार शतक झळकावले. एल्गर 23 चौकारांच्या मदतीने 211 चेंडूत 140 धावांवर खेळत आहे. त्याच्या शतकामुळे आफ्रिकेने दुसऱ्या दिवस अखेर 5 बाद 256 धावा करताना भारतावर 11 धावांची आघाडी घेतली आहे.
आता भारताला तिसऱ्या दिवशी शक्य तितक्या लवकर दक्षिण आफ्रिकेला रोखावे लागेल आणि त्यांना पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखावे लागेल. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 50 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतल्यास भारताला सामन्यात पुनरागमन करणे कठीण होईल.
एल्गर सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांविरुद्ध पूर्ण फॉर्ममध्ये दिसला आणि लंच ब्रेकनंतर त्याने जोरदार फलंदाजी केली. एल्गरचे हे कसोटी क्रिकेटमधील 14 वे शतक होते. त्याच्या दमदार फलंदाजीमुळेच चहापानाच्या ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ 3 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. यापूर्वी त्याने टोनी जॉर्जी(28)सोबतही महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांसह डेव्हिड बेडिंगमनेही दुसऱ्या दिवशी अर्धशतकी खेळी खेळली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा एल्गरसह मार्को जानसेन ३ धावा करून तंबूत मागे परतला.
भारताकडून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोनच गोलंदाजांनी दोन विकेट तर प्रसिद कृष्णाने एक विकेट मिळविली आहे.
तत्पूर्वी, के.एल. राहुलच्या (101) दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. राहुल शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला भारतीय संघासाठी विशेष काही दाखवता आले नाही.
#SAvsIND 1st Test Day 2 : राहुलचं शानदार शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला…
भारतीय संघ 245 धावांवर ऑलआऊट…
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.4 षटकांत 245 धावांवर आटोपला. आज भारताने आठ बाद 208 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला आणखी 37 धावांची भर घालता आली. आजचा पहिला धक्का मोहम्मद सिराजच्या (22 चेंडूत 5 धावा) च्या रूपाने बसला. गेराल्ड कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्यानंतर नांद्रे बर्जरने राहुलला क्लीन बोल्ड करत भारताचा डाव संपवला.
#SAvsIND 1st Test Day 2 : राहुलने शतक झळकावून मोडले अनेक मोठे विक्रम, सचिन-कोहलीही टाकले मागे..
आज टीम इंडिया मैदानात आली तेव्हा राहुल 70 धावा करून खेळत होता. यानंतर त्याने कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. 137 चेंडूंत 14 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 101 धावा करून तो बाद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने 20 षटकांत 59 धावांत 5 खेळाडू बाद केले. पहिली कसोटी खेळताना नांद्रे बर्जरने 3 बळी घेतले. मार्को युनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना 1-1 यश मिळाले.
पहिल्या दिवशी काय झाले?
तत्पूर्वी, पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल 17 धावा करून तर शुभमन गिल दोन धावा करून माघारी परतला. 24 धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले
विराट 38 धावा करून बाद झाला तर श्रेयस 31 धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने 24 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, पण केएल राहुलने खालच्या फळीतील फलंदाजांसह डाव संभाळत शतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत (245 धावा) नेले.
संक्षिप्त धावफलकः
भारत : पहिला डावः 67.4 षटकांत सर्वबाद 245 (के.एल राहुल 101, शार्दूल ठाकूर 24; कागिसो रबाडा 5-59, नांद्रे बर्गर 3-50, गेराल्ड कोएट्झी 1-74, मार्को जानसेन 1-52);
दक्षिण आफ्रिका : पहिला डावः 66 षटकांत 5 बाद 256 (डीन एल्गर खेळत आहे 140, टोनि जार्जी 28, डेव्हिड बेडिंगम 56, मार्को जानसेन खेळत आहे 3; जसप्रित बुमराह 2-48, महंम्मद सिराज 2-63, प्रसिद कृष्णा 1-61)