Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही घटना थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घडली असल्याची माहिती समोर आली आहे. महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबत त्यांचा एका समर्थक जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे.
या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली. आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली.
गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. विस्तृत माहिती देण्यास पोलीस नकार देत आहेत. आमदार गायकवाड यांना पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले आहे. शहरप्रमुख गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार गायकवाड यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.