नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण पत्रिकेचे वाटप सुरु आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकारण चांगलेच तापत चालले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव आणि राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर मंदिराबाबत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मंदिर म्हणजे मानसिक गुलामीचा मार्ग, असा दावा या पोस्टरवर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादूर यांचा फोटो पोस्टरवर लावण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वीही काही विधाने करून वाद ओढवून घेतला होता. आता पुन्हा एकदा ते या पोस्टरमुळे चर्चेत आले आहेत,
यामधील एका पोस्टरवर मंदिर आणि शाळा यांच्यामध्ये तुलना करण्यात आली आहे. या पोस्टरवर एकीकडे लालू यादव आणि राबडी देवी यांचा फोटो आहे, तर दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही फोटो लावण्यात आलाय. शिवाय, पोस्टरच्या वरिल बाजूस गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा फोटो लावण्यात आला आहे.
#WATCH | Patna: RJD supporters put up a poster outside the residence of former Bihar CM Rabri Devi quoting the statement of India’s first female teacher Savitribai Phule. pic.twitter.com/tDjB17nhST
— ANI (@ANI) January 1, 2024
पोस्टरवर नेमका मजकूर काय ?
शाळा म्हणजे जीवन प्रकाशमय करण्याचा मार्ग आहे. मंदिरातील घंटी वाजली की, अंधश्रद्धा, अज्ञानतेकडे आपण जात असल्याचा संदेश दिला जातो. तर शाळेची घंटी वाजली की, आपण वैज्ञानिकता, तर्क लावण्याच्या क्षमतेकडे जात असल्याचा संदेश मिळतो . आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे, असा आशय या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.