पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गासोबत आचार्य आनंद ऋषिजी चौक (पुणे विद्यापीठ चौक) ते रिझर्व्ह बॅंक (हरेकृष्ण पथाजवळ) उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी या दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने प्रत्येकी साडे चार मीटर रुंद केला जाणार असून त्यासाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका प्रशासनास दिली आहे.
त्यानंतर लगेचच महापालिकेकडून हे रूंदीकरणाचे काम सुरू केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने 8 कोटी 99 लाख रूपयांची निविदा काढली आहे. दरम्यान, या रस्त्याच्या रूंदीकरणात 21 जागा बाधित होत असून त्यातील 16 जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. तर उर्वरित जागांमध्ये तीन जागा शासकीय असल्याने तातडीने काम करता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या चौकात मेट्रोसोबत पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपूल, समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधले जाणार आहे.
मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामामुळे विद्यापीठ चौकासह बाणेर रस्ता, औंध रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विद्यापीठ चौकातून शिवाजीनगरकडे येताना हा उड्डाणपूल रिझर्व्ह बॅंकेजवळ उतरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सेवा रस्ते (सर्व्हिस रस्ते) मोठे असणे असणे आवश्यक आहे. अन्यथा उड्डाणपूल ज्या ठिकाणी उतरतो तेथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
रस्ता 45 मीटर रुंद होणार
रुंदीकरणानंतर हा रस्ता 45 मीटर रुंदीचा होणार असून हे काम पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.