कच्च्या मालाअभावी मूर्तीकारांसमोर अडचणी; दरवाढ होणार, उत्पादन घटले
पिंपरी – करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा शहरातील गणेशमूर्ती करागीरांनाही मोठा फटका सहन करावा लागला आहे. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यावर्षी मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्च्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच रंग आणि वाहतुकीचे भावही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता मूर्तीकारांकडून वर्तविण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सांगवी, पिंपरीगाव, मोशी व पिंपळे गुरव परिसरात गणेशमूर्ती बनिवल्या जातात. गणेशमूर्ती बनवणारे बहुतांश कारागीर याच परिसरात आहेत. गणेशमूर्ती बनवणारे कारागीर संपूर्ण वर्षभर लहान मूर्ती बनविता. व गणेशोत्सावाच्या अगोदर लहान मूर्तींच्या रंगरंगोटीला सुरुवात केली जाते. यावर्षीही मार्च महिन्याच्या आगोदर लहान गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे घरगुती मूर्ती बनविण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. मूर्तीकारांना लहान तसेच मोठ्या मूर्ती बनविण्यासाठी लागणारे पीओपी राजस्थान, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातून येते. तसेच मूर्तीसाठी काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग आदी घटकही लागतात.
मात्र, लॉकाडाउन मुळे राज्याच्या सिमा बंद असल्यामुळे कच्चा माल मिळवण्यासाठी मूर्तीकारांना अडचणीचा समाना करावा लागत आहे. त्यामुळे, शहरातील मूर्तीकारांकडून दरवर्षीप्रमाणे मूर्तीचे उत्पादन झालेले नाही. त्यातच वाहतूक खर्च आणि रंगाचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी भाव वाढ होण्याची शक्यता मूर्तीकारांनी वर्तविली आहे.
करोना महामारीमुळे आगोदरच महागाईचा उच्चांक होत असताना आता पुढील महिन्यापासून सुुरू होणाऱ्या विविध सणांवरही महागाईचे सावट पसरले आहे. त्यामुळे, गणेशोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत सर्व सणाला यावर्षी करोनाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
करोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच गणिते बिघडली आहेत. मार्च महिन्यानंतर कच्चा माल उपलब्धच झालेला नसल्यामुळे गणेशमूर्ती बनविताना मर्यादा आल्या. त्यामुळे, मागील वर्षीपेक्षा 20 ते 30 टक्के गणेशमूर्ती कमी बनविल्या आहेत. त्यातच रंगाचे आणि पीओपीचे भावही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे यावर्षी गणेशमूर्तीच्या किंमतीमध्ये वाढ करावी लागणार आहे.
– सागर सुडके, गणेशमूर्तीकार