शिक्रापूर (प्रतिनिधी) – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसर तसेच बाजूच्या परिसरात एकामागे एक असे पाच रुग्ण आढळून आले आहेत. अशातच आता पुन्हा नव्याने शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसर तसेच जातेगाव बुद्रुक येथे प्रत्येकी करोना बाधित रुग्ण आढळून आला. यामुळे शिक्रापूरसह परिसर हादरून गेला आहे.
येथील मलठण फाटा परिसरात राहणारा सदर रुग्ण शिक्रापूर येथील एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. दोन दिवसांपूर्वी सदर इसमाला सर्दी, खोकला व तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्याने शिक्रापूर येथील दोन वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराचे प्रयत्न केले. परंतु, त्या इसमाला करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे जावून करोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होते. त्यानंतर सदर इसमाची कोरोना तपासणी करण्यात आली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील सदर इसमाचे पिंपळे जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ये जा असून त्याला देखील स्वतः बाबत काही त्रास जाणवू लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिक्रापूर व जातेगाव येथील दोन ठिकाणी करोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या वतीने सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणचा सर्व परिसरात औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केला आहे. तर शिक्रापूर सदर व्यक्तींच्या संपर्कात असलेले त्याच्या पत्नी, आई व भाऊ व भावाची पत्नी यांना तपासणीसाठी नेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जातेगाव बुद्रुक येथील सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक येथे प्रथमच करोनाचे शिरकाव केला असून गावामध्ये प्रथमच रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.