“भीक मागो आंदोलन’ करीत तहसील कार्यालयाला व्हीलचेअर दिली भेट
मंचर – मानवता भावनेतून आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेऊन दिव्यांग बांधवांना येण्या-जाण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देणे गरजेचे होते; परंतु त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिव्यांग बांधवांनी विविध गावांत जाऊन भीक मागो आंदोलन करीत पै-पै जमा केले आणि व्हिलचेअर घेऊन ती वाजतगाजत घोडेगाव तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. 7) सकाळी नेऊन दिली. दिव्यांग बांधवांच्या अनोख्या गांधीगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
निवासी नायब तहसीलदारांनी केला स्वीकार
महसूल विभागाच्या आंबेगाव तहसीलदार कार्यालयाची आर्थिक स्थिती खरोखरच खालावली आहे, असे समजून दिव्यांग व्यक्तींचे तहसीलदार कार्यालयात होणारे हाल टाळण्यासाठी दिव्यांग बांधवांनी तालुक्याच्या विविध गावांत जाऊन “भीक मागो आंदोलन’ केले. अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी पुढाकार घेत व्हिलचेअर उपलब्ध केली. घोडेगाव येथील तहसील कार्यालयाबाहेर दिव्यांग बांधव एकत्रित आले आणि तहसीलदार कार्यालय, घोडेगाव यांना ताशाच्या निनादात व्हिलचेअरला पुष्पहार घालून गांधीगिरी करत ती भेट दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार ए. बी. गवारी यांनी व्हीलचेअरचा स्वीकार केला.
प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी व्हिलचेअर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, घोडेगाव येथील आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात अद्यापही व्हिलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कामानिमित्त आलेल्या दिव्यांग बांधवांची त्यामुळे फरपट होत होती. ही बाब समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, तसेच अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी तहसीलदार रमा जोशी यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
तहसील कार्यालयाला कोणताही निधी उपलब्ध नसल्याने पंचायत समिती आंबेगावकडून दिव्यांग 5 टक्के निधीमधून तरतूद करून तहसीलदार कार्यालयात लवकरच व्हिलचेअर उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार रमा जोशी यांनी दिले होते; परंतु दोन महिने होऊनही व्हिलचेअर उपलब्ध झाली नाही, त्यामुळे गांधीगिरीच्या माध्यमातून ही व्हिलचेअर तहसील कार्यालयाला देण्यात आली.
यावेळी अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढोबळे, समर्थ दिव्यांग कल्याण कार्य सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील दरेकर, सचिव पांडुरंग काळे, खजिनदार पूनम काळे, सचिन गुंजाळ, भीमाजी डांगले, आरती झोडगे, दीपक पिंगळे, नरेंद्र गावडे, गणेश कोकणे, गणेश चांगण आदी उपस्थित होते.
मानवता भावनेतून तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेऊन दिव्यांग बांधवांसाठी व्हिलचेअर उपलब्ध करून देणे गरजेचे होते; परंतु त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने दिव्यांग बांधवांनी विविध गावांत जाऊन “भीक मागो आंदोलन’ केले आणि त्यातून आलेल्या पैशांतून व्हीलचेअर आणली. ही बाब सरकारी कार्यालयाला भूषणावह नाही.
-दीपक ढोबळे, संस्थापक-अध्यक्ष अपंग हित, विकास व पुनर्वसन संघ