आरिफ शेख
सौदी अरेबियाचे शासक असलेले राजे सलमान हे वृद्धापकाळाने गंभीर आजारी आहेत. त्यांच्या हयातीतच राजगादी काबीज करण्यासाठी त्यांचे पुत्र मोहम्मद बिन सलमान ऊर्फ “एमबीएस’ यांनी कटकारस्थान सुरू केले आहेत. सौदी राजघराण्यात सुरू असलेल्या सत्तेच्या या “गेम ऑफ थ्रोन’ विषयी…
सौदी राजघराण्यात सत्तासंघर्षांच्या बातम्या मागील काही दिवसांपासून जगभर चर्चेत आहेत.राजे सलमान यांच्या हयातीत त्यांचे पद काबीज करण्याचा मनसुबा त्यांचे सुपुत्र व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रचला आहे. “बैत’ (राजेपदासाठी शपथेसह मान्यता) देण्यास नकार देणाऱ्या काका प्रिन्स अहमद व चुलतबंधू युवराज मोहम्मद बिन नायफ यांना मोहम्मद बिन सलमान यांनी गजाआड केले आहे.
सौदी राजघराण्याची स्थापना राजे अब्दुल अझीझ यांनी केली होती. ते सौद यांचे सुपुत्र होते. त्यावरूनच सौदी अरेबिया हे त्या देशाचे नामाभिधान झाले. राजे अब्दुल अझीझ यांना दोन डझन राण्या होत्या. त्यापासून सुमारे पन्नास एक युवराज व तितक्याच प्रिन्सेस जन्मल्या. पैकी एक राणी हस्सा सुदेरीपासून झालेल्या सात मुलांनी राजे अझीझनंतर तेथील गादी सांभाळली. सध्याचे राजे सलमान हे राजे अझीझ यांचे सुपुत्र आहेत. राजाच्या मृत्यूनंतर गादीचा वारस मुलगा नव्हे तर भाऊ ठरतो, ही सौदी घराण्याची परंपरा आहे. त्यानुसार राजे सलमाननंतर त्यांचे सर्वात धाकटे बंधू प्रिन्स अहमद बिन अब्दुल अझीझ (वय 75) हे परंपरेनुसार राजगादीचे वारस ठरत होते. मात्र ही राजप्रथा डावलून राजे सलमान यांनी आपल्या लाडक्या मुलास (एमबीएस)क्राऊन प्रिन्स नेमले. तत्पूर्वी क्राऊन प्रिन्स असलेले मोहम्मद बिन नायफ यांची पदावरून हकालपट्टी केली. आता प्रिन्स अहमद व बिन नायफ या दोघांना राजदरबारात बोलावून त्यांच्याकडून एमबीएसच्या राजेपदासाठी संमती मागितली. ज्यास बैत म्हटले जाते. या दोघांनी त्यास नकार दिला. त्यानंतर उभयतांना राजद्रोहाच्या आरोपाखाली डांबण्यात आले आहे.
राजेपदाला अडसर ठरणाऱ्या प्रत्येकाला एमबीएस यांनी निष्ठुरपणे बाजूला केले. नायफ यांच्या जागी क्राऊन प्रिन्स झाल्याबरोबर एमबीएस यांनी सर्वात महत्त्वाचे संरक्षण खाते ताब्यात घेतले. नॅशनल गार्ड म्हणून सुमारे लाखभर प्रशिक्षित सैन्य जे फक्त राजाची आज्ञा मानतात, त्याच्या प्रमुखपदी दिवंगत राजे अब्दुल यांचे पुत्र होते. त्यांची हकालपट्टी केली. सध्याच्या संघर्षात या सैन्यदलाकडून जीवितास काही दगाफटका होऊ नये म्हणून एमबीएस यांनी स्वसुरक्षेसाठी विदेशी सैनिक नियुक्त केले. संरक्षणमंत्री होताच एमबीएस यांनी येमेन या शेजारील देशाशी युद्ध पुकारले. इराण समर्थक होसी बंडखोरांनी सौदी सैनिकांना नाकीनऊ आणल्यानंतर युद्धात सहभागी अन्य अरब राष्ट्रांनी यातून अंग काढून घेतले. आज सौदी अरेबिया या युद्धात अडकला आहे. ते जिंकता येत नाही अन् माघार घेण्याची नामुष्की स्वीकारता येत नाही. या युद्धखोर भूमिकेबाबत अनेक अरब राष्ट्रे नाराज आहेत, राजघरण्यातदेखील यावरून मतभेद आहेत. मात्र, एमबीएसच्या दहशतीपुढे कोणी “ब्र’ काढत नाहीत.
विरोधी भूमिका घेणाऱ्या लेबनान या देशाचे पंतप्रधान साद हरिरी यांना चक्क सौदीत डांबून ठेवून त्यांना याच एमबीएस यांनी राजीनामा द्यायला लावला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजघराण्यातील असंख्य युवराजांना रियाधमधील रिट्झ कार्लटन हॉटेलात बंद करून त्यांच्याकडून सुमारे दोनशे अब्ज डॉलर वसूल केले, (खरे तर ही एक प्रकारे खंडणीच होती.) मग त्यांची सुटका केली. टीकाकार व राजकीय विरोधक त्यांना संपवून टाकायचे आहेत. यात ते बऱ्यापैकी यशस्वी झालेत. पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात सौदी दूतावासात हत्या करणे, हे त्याचे मोठे उदाहरण. या प्रकरणी अनेक पुरावे व ऑडिओ टेप तुर्की सरकारने जाहीर केल्या.
हत्येची सुई एमबीएसकडे होती. मात्र अन्य अकरा जणांना बळीचा बकरा बनविले, डोनाल्ड ट्रम्प यांनी एमबीएस यांना या संकटातून वाचविले. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले हे हत्याकांड पचल्यानंतर एमबीएस यांचे धाडस आणखीच वाढले. आपल्या सुधारणावादी धोरणांना विरोध केला म्हणून चक्क मक्केच्या मशिदीचे प्रमुख धर्मगुरू यांना गजाआड केले. राजद्रोहाचा आरोप ठेवून प्रमुख शिया धर्मगुरूस फाशी दिली. शेजारील देश कतारशी वाद झाल्यावर त्याचा एकमेव खुष्कीचा मार्ग सौदी सीमेशी जोडलेला होता, तेथे भव्य कालवा खोदून तो मार्ग जलमय केला. चहुबाजूने कतारला समुद्रात लोटण्याचा हा अघोरी प्रयत्न होता. पॅलेस्टाईन प्रश्नी तेथील जनतेला वाऱ्यावर सोडून इस्रायल धार्जिणी भूमिका घेतली. अमेरिकी काठीने इराणला जायबंदी करण्याची स्वप्ने ते आता बाळगून आहेत.
राजे सलमान यांचे एकनिष्ठ सुरक्षा अधिकारी जनरल अब्दुल अझीझ यांचा नुकताच संशयास्पद गोळीबारात मृत्यू झाला. मित्राशी झालेल्या भांडणातून तो झाल्याचे सांगितले गेले. मात्रल जनरल अझीझ यांच्या मुलाने आरोप केला की, आपल्या वडिलांना ठरवून मारले गेले, त्याने कोणाचे नाव घेतले नाही, तरीदेखील या मुलास सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. जनरल अझीज हे राजे सलमान यांना राज्यकारभारविषयक गुप्त हालचालींची माहिती देत. एमबीएस यांना ही बाब खटकत होती, असा या हत्याकांडामागील संदर्भ असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमातून झाली.
एमबीएस यांना राजेपदी बसण्याची एवढी घाई का झाली? याचे उत्तर अमेरिकेच्या निवडणुकीत दडले आहे. वर्ष अखेरीस होणाऱ्या या निवडणुकीत जर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले नाही, तर अमेरिकेच्या सौदीबाबतच्या धोरणात बदल होतील. अमेरिकेतील नवे राष्ट्राध्यक्ष हे एमबीएस यांना राजेपदी येऊ देणार नाहीत. युरोपीय युनियन, अमेरिकेतील अनेक शक्तिशाली घटक, सौदी राजघराण्यातील अनेक युवराज व बाह्य जगतात संभाव्य राजे म्हणून एमबीएसपेक्षा महंमद बिन नायफ यांना अधिक पसंती आहे. ट्रम्प सत्तेत आहे तोवरच आपला राज्यरोहण सोहळा एमबीएस यांना उरकून घ्यायचा आहे. पित्याच्या मृत्यूपर्यंत त्यांना धीर निघत नाही.
भविष्यात वडिलांच्या मृत्यूनंतर जर ट्रम्प सत्तेत नसले तर राजेपद कायमचे हुकले, याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली आहे. एमबीएस यांचे वय सुमारे 35 वर्षे इतके आहे. ते राजे झाल्यास आगामी तीन-चार दशके तरी पदावरून पायउतार होणार नाहीत. त्यांची हुकूमशाही कार्यपद्धती पाहता मध्यपूर्वेत त्यांच्यामुळे नवे प्रश्न निर्माण होतील.