6 नगरसेवक राष्ट्रवादीच्या, तर 4 शिवसेनेच्या वाटेवर?
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या येत्या एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील गणेश नाईक यांचे प्रस्थ मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नुकताच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आता थेट नाईक गटातील नगरसेवकांनाच सुरुंग लावण्यात आल्याचे दिसत आहे.
आधी भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. आता पुन्हा भाजपचे 6 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा गणेश नाईक गटाला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देऊन गणेश नाईक यांच्यासोबत भाजपवासी झालेले नगरसेवक पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. याचं अनुषंगाने या 6 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या राजकीय खेळीतून गणेश नाईकांना चांगलाच शह दिल्याचेही बोलले जात आहे. नवी मुंबईच्या तुर्भे भागातील भाजपचे 4 नगरसेवक काही दिवसांपूर्वीच शिवसनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. यात सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगिता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांचा समावेश होता. या सर्वांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.