नवी दिल्ली – बीसीसीआय, निवड समिती यांचा माझ्याबाबतचा दृष्टिकोन अचानक कसा बदलला. अध्यक्ष सौरव गांगुली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी माझे संघातील स्थान भक्कम असल्याचे सांगितले होते, मग त्यांनी शब्द का फिरवला, अशा शब्दात भारताच्या कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने संताप व्यक्त केला आहे.
माझे संघातील स्थान भक्कम आहे, असे आश्वासन खुद्द गांगुली यांनीच दिले होते. मग अचानक एक दिवस द्रविड यांनी मला निवृत्तीचा विचार कर असा सल्ला दिला. मला या दोघांच्याही बदललेल्या भूमिकेने प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. माझी कामगिरी चांगली होत असूनही माझ्या नावाचा विचार संघ निवडीसाठी यापुढे होणार नसल्याचे कसे काय सांगितले गेले, असा सवालही त्याने केला आहे.
भारतीय संघाचा मी एक भाग होतो त्यामुळे मला हे सर्व माध्यमांशी बोलता आले नाही, पण काहीतरी निश्चितच घडले आहे. संघातील स्थान पक्के असूनही मला अचानक निवडीचा विचार होणार नाही हे कोणी सांगितले व ठरवले हे मला माहिती नाही. द्रविड यांनी मला असा सल्ला का दिला ते देखील मला समजत नाही. मी केवळ विश्रांतीसाठीच रणजी स्पर्धेत सहभागी झालो नाही, पण त्याची पूर्वकल्पना मी बीसीसीआयला दिली होती. आता पुढे काय करायचे याचा विचार मला अस्वस्थ करत आहे, असेही साहाने सांगितले.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या 4 मार्चपासून सुरुवात होत आङे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करतानाच रोहित शर्माकडेच एकदिवसीय व टी-20 संघासह कसोटी संघाचेही नेतृत्व सोपवण्यात आले.
गांगुलींची भूमिका अनाकलनीय
न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या वर्षी झालेल्या कानपूर कसोटीत अर्धशतकी खेळी केली होती, तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मला मोबाइलरवर मेसेज केला होता व माझे अभिनंदनही केले होते. माझ्यावर विश्वास असून संघातील स्थानाची चिंता करू नकोस असेही त्यांनी सांगितले होते. मग अचानक असे काय घडले की मला डच्चू दिला गेला, असा सवालही साहा याने केला आहे.
पत्रकाराची धमकी
भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात न आल्याने लगेचच माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी एका पत्रकाराने मला संपर्क केला व मुलाखत मागितली. माझी तयारी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने मला धमकीही दिली. तुझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची ही योग्य वेळ आहे, असे सांगत त्याने मला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, मी सतत नकार दिल्यानंतर त्याने मला धमकीही दिली, असा दावाही साहाने केला आहे.