Gaganyaan Mission – “मंगळयान’ आणि “चांद्रयान-3′ च्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) “गगनयान’ (Gaganyaan Mission) मोहिमेद्वारे अंतराळात भारतीय अंतराळवीर पाठवण्याच्या मोहिमेवर काम करत आहे.
हे “गगनयान’ (Gaganyaan Mission) चालवणारी पायलट एक भारतीय महिला (Female Pilot) अंतराळवीर असेल, असे प्रयत्न केले जात असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S. Somanath) यांनी नुकतीच दिली आहे.
सोमनाथ म्हणाले की, प्रस्तावित भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाणाच्या “गगनयान’ मोहिमेसाठी भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांमधून अंतराळवीराची निवड करण्यात येत आहे.
मात्र, सध्या एकही महिला फायटर जेट पायलट नसल्यामुळे, 2025 मध्ये होणाऱ्या या मिशनसाठी एखाद्या महिलेची निवड करण्याबाबत विचार सुरु आहेत. महिलांना अंतराळात जाण्याचा दुसरा मार्ग वैज्ञानिक म्हणून असेल, असे सोमनाथ यांनी सांगितले.
परदेशी अवकाश संस्थांप्रमाणे भारतालाही संशोधनासाठी अवकाशात वैज्ञानिक पाठवायचे आहेत. पुढील दशकात स्पेस स्टेशन उभारण्याचीही योजना आहे. पुढील वर्षी गगनयान मोहिमेसाठी प्रक्षेपण वाहनाच्या मानवरहित चाचणी उड्डाणांवर एक महिला ह्युमनॉइड (स्त्रीसारखा दिसणारा रोबोट) पाठवण्यात येईल.
आजपर्यंत वर्ष 1984 मध्ये भारत-सोव्हिएत युनियन संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून विंग कमांडर राकेश शर्मा (आता निवृत्त) हे एकच भारतीय अंतराळात गेले आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि घोषणा केली की 2035 पर्यंत भारतात एक अंतराळ स्थानक असेल आणि 2040 पर्यंत चंद्रावर मानव असेल.