लखनौ – आधुनिक युगातही लोक अंधश्रद्धेच्या साखळीत अडकल्याची अनेक प्रकरणे समोर येत असतात. याचे जिवंत उदाहरण यूपीच्या झाशी जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका धार्मिक स्थळी मृत व्यक्तीला जिवंत करण्यासाठी दरबार भरवण्यात आला होता. हे पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तास हा दरबार सुरू होता.
ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील झांसी विभागातील मौरानीपूर तालुक्यातील हिरापूर गावातील आहे. येथे राहणारे पंचम लाल हे आजारी होते. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. याची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, गावाबाहेरील धार्मिक स्थळावर एका महिलेने देवी मातेची आपल्यावर कृपा आहे, माझ्या शरीरात देवी आहे, सांगून मृत व्यक्तीला मी जीवंत करत असल्याचा दावा केला.
मृत व्यक्तीला जीवंत करण्याचा दावा –
मृत व्यक्तीला जिवंत करणार असल्याचा दावा ती महिला करत होती. हे समजताच गावातील लोक मृतदेह घेऊन तेथे पोहोचले. ही बातमी गावात व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचताच तेथे मोठी गर्दी झाली. तेथे अनेक तास जनसमुदायासमोर दरबार भरवण्यात आला. मृत व्यक्ती पंचमच्या शरीरात जीव घातल्याचा दावा ही महिला सातत्याने करत होती.
जे घडायचे होते तेच घडले –
पंचम यांना जीवंत करण्यात ती महिला अपयशी ठरली. यानंतर लोकांनी खासगी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, काही तासांपूर्वीच पंचम यांचा मृत्यू झाला आहे.
मृताच्या भावाने सांगितले की, काल त्यांच्या भावाची तब्येत अचानक बिघडली. छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. नंतर घरी आणले. मात्र, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. पुन्हा रुग्णालयात नेण्यासाठी वाहन बोलावण्यात आले. घरातील लोक रडत होते. दरम्यान ती महिला आली आणि म्हणाली की ते जिवंत होण्याची आशा आहे…पण घडायचे तेच घडले. पंचम यांचा मृत्यू झाला.