पुणे – जी- 20 ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत “याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.
पालकमंत्री पाटील आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्गसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-20 प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारण्यात आल्या होता. पालकमंत्र्यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते. प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.
पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. भगव्या पताका, महिलांचा डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, “राम कृष्ण हरी’, “ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला. काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वच जण आपल्या मोबाललमधून वारीची छायाचित्रे काढून घेण्यात दंग झाले. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.