नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवाचे काल शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिद्धू मुसेवाला यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तर शरीरात एक गोळी सापडली आहे. सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा आढळल्याची माहिती पोस्टमार्टम अहवालातून समोर आली आहे.
प्राथमिक तपासामध्ये जखमांमुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे सिद्धू यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर आज सिद्धू यांच्या पार्थिवावर अंत्संयस्कार करण्यात येणार आहेत. मानसा सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी पोस्टमार्टम अहवाल लवकरच सीलबंद लिफाफ्यामध्ये पोलिसांना पाठवला जाणार असल्याचे म्हटले.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी महत्त्वपूर्ण सुगावा लागल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, काही लोकांची चौकशी केल्यानंतर अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी डेहराडून येथून पाच जणांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.