तारगावमध्ये शोकाकूल वातावरण, थोरल्या बंधूंसह दोन्ही मुलींनी दिला पार्थिवाला अग्नी
रहिमतपूर – सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले तारगाव (ता. कोरेगाव) येथील संभाजी केशवराव भोसले (वय 41) हे त्रिपुरामधील पानीसागर याठिकाणी कर्तव्य बजावत असताना शनिवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव तारगाव येथे आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान दाखल झाले. त्यांचे मोठे बंधू शहाजी तसेच सरंभाजी यांच्या मुली तनुजा (वय13) व अपर्णा (वय9) यांनी हजारो लोकांच्या साक्षीने येथील कृष्णा नदीकिनारी संभाजी यांच्या पार्थिवास अग्नी दिला.
तारगांव येथील संभाजी भोसले 1999 मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या सुट्टीत ते घरी आले होते. तसेच काही दिवसांतच ते निवृत्त होणार होते. त्या संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून 30ऑक्टोबर 2019 रोजी ते कामावर हजर झाले होते. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री बंदोबस्त करीत असताना गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी गावात कळली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.
कामावर हजर होण्यापूर्वी गावातील मित्र तसेच घरातील अनेकांशी बोलून मी लवकरच निवृत्त होऊन परत येत आहे, परत आल्यावर कुठे दुसरी नोकरी मिळाली तर करायची नाहीतर शेती करू, असे त्यांनी घरातील सदस्यांना सांगितले होते. परंतु, कामावर हजर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिवशी गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी गावात आली. तेव्हापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. त्यांच्या पार्थिवाची वाट सर्वजण पाहत होते. खराब हवामानामुळे पार्थिव येण्यास उशीर झाला.
काल संध्याकाळी त्यांचे पार्थिव त्रिपुरा येथून निघाले. सकाळी सात वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. सीमा सुरक्षा दलाच्या वाहनाने सकाळी साडेअकरा वाजता तारगावमध्ये पोहोचले. संभाजी भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातील गावांतील अनेकांनी गर्दी केली होती. पार्थिव प्रथम घरी नेण्यात आले. पत्नी अलका व आई यांनी तिरंग्यात लपटलेले पार्थिव पाहताच मोठा आक्रोश केला. यावेळी उपस्थित सर्व गहिवरून गेले.
सजवलेल्या गावातून अंतिम यात्रा काढण्यात आली. पूर्ण रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. कृष्णा नदीकाठावरील पटांगणात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने,शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन सिद्धेश्वर पुस्तके, पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम, सरपंच सुलभा तावरे, उपसरपंच सुनीता निकम, रहिमतपूरचे एपीआय घनश्याम बल्लाळ, सैनिक कार्यालय प्रमुख सी. टी. पवार, शिवाजी पवार, सीमा सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडर श्रीधर निकम, शेरासिंग तुंडवाल यांच्यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण श्रद्धांजली वाहिली.
रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या वतीने हवेत फायर करून सलामी दिली. सीमा सुरक्षा दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पार्थिवाला लपेटलेला तिरंगा काढून वडील केशवराव भोसले व चुलते कांतीलाल पाटील यांच्या हवाली करण्यात आला. संभाजी यांचे मोठे भाऊ शहाजी व संभाजी यांच्या लहान मुली तनुजा व अपर्णा यांनी पार्थिवाला भडाग्नी दिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. संभाजी यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुली तनुजा व अपर्णा तसेच दोन भाऊ असा परिवार आहे.