वर्धा : हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेला अखेरचा निरोप देण्यासाठी हिंगणघाटच्या आसपासच्या गावातील गावकऱ्यांनी देखील पीडितेला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. दारोडा गावाच्या स्मशानभूमीत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी दारोडा गावातून पीडितेच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.
दरम्यान पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आणण्यात येत असताना संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर देखील दगडफेक लाठीहल्ला केला. आरोपी विक्की नगराळे याला फाशी देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थानी केली आहे.
हिंगणघाट पीडित तरुणीचा सोमवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. गेल्या सहा दिवसापासून पिडीवतेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर सातव्या दिवशी उपचारा दरम्यान पीडितेच्या मृत्यू झाला.