पुणे: शहरातील नामांकित डॉक्टरला ऍट्रोसिटीच्या गुन्हयाची भिती दाखवत तब्बल 75 लाखाची खंडणी उकळण्यात आली. उर्वरीत 55 लाखाच्या खंडणीसाठी वारंवार त्रास दिल्याने संबंधीत डॉक्टरने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानूसार मनोज अडसुळ (अत्रे) याच्याविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ.दिपक प्रभाकर रासने(69,रा.तपोवन सोसायटी, पर्वती) यांचा मुलगा डॉ.साहिल याच्याविरुध्द ऑक्टोबर 2019 रोजी विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल आहे. ही तक्रार दाखल करणारी महिला दलित मुस्लिम समाजाची होती. याप्रकरणात मनोज अडसूळ याने तुमच्या मुलावर बलात्कार, ऍट्रोसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भिती दाखवली.
याप्रकरणी आरपीआय व इतर संघटनांचे लोक फिर्यादीच्या मुलाला अटक करा म्हणून मागे लागले होते. दरम्यान फिर्यादीच्या मुलास 3 ते 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते असे अडसुळ याने धमकावले. हे प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांची मागणी त्याच्याकडून करण्यात आली. यासाठी फिर्यादी खोटे आश्वासन देऊन धनादेशाव्दारे 54 लाख आणी रोख 21 लाख रुपये घेण्यात आले. उर्वरीत 55 लाखाची रक्कम घेण्यासाठी फिर्यादीच्या मुलाला अटक होईल अशी सातत्याने धमकी देण्यात येत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी डॉ.रासने गॅस्ट्रोलॉजीस्ट आहे. त्यांचा मुलगाही गॅस्ट्रोलॉजीची प्रॅक्टीस करतो. त्यांच्या मुलाविरुध्द एका महिलेचा फक्त तक्रार अर्ज आला होता. तर आरोपी अडसूळ हा डॉ.रासने यांच्या परिचीत असलेल्या डॉक्टरांचा भाऊ आहे. तो ब्रोकर म्हणून काम करतो. त्याने डॉ.रासनेंना मुलाला संबंधीत प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी 1 कोटी 30 लाखाची मागणी केली होती. यातील 75 लाख रुपये मिळाल्यावर उरलेले 55 लाख मिळवण्यासाठी त्याने सातत्याने पाठपुरावा केला होता.