मंचर (प्रतिनिधी) – करोनाच्या गंभीर परिस्थितीवर मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज योजनेंतर्गत भीमाशंकर औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया क्लस्टर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारसह आयुष मंत्रालयाकडे केली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, तसेच वनमंत्री संजय राठोड आदींना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून आदिवासी भागामध्ये भीमाशंकर औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया क्लस्टर उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
टाळेबंदीमध्ये सर्वच क्षेत्रांची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजअंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्डांतर्गत देशात मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया क्लस्टर उभारण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव, जुन्नर व खेड हे तालुके दुर्गम आणि आदिवासीबहुल आहेत.
माजी खासदार आढळराव पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारकडे भीमाशंकर औषधी वनस्पती आणि प्रक्रिया क्लस्टर येथील 500 एकर वन क्षेत्रावर उभारण्यात यावे. या वनक्षेत्रावर उत्पादित होणाऱ्या वन औषधींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र देखील उभारण्यात यावे, असे पत्रव्यवहाराद्वारे सुचविले आहे. औषधी वनस्पती लागवड व प्रक्रियेचे क्लस्टर भविष्यात आदिवासी समाजसाठी रोजगाराचे उत्तम मॉडेल ठरून आदिवासी बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी खात्री यावेळी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
देशात 10 लाख हेक्टरसाठी नियोजन
भीमाशंकर (ता. आंबेगाव) हे अभयारण्य असून, येथील आदिवासी समाजाचा चरितार्थ येथील जंगलावर आधारित आहे. मात्र, सध्या वनक्षेत्र घटत असल्याने आदिवासी समाजाला रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. या समाजाचे औषधी वनस्पतींच्या औषधोपचाराच्या ज्ञानाचे आणि कौशल्याचे संवर्धन, जतन होणे गरजेचे आहे. यानुसार देशात 10 लाख हेक्टरवर औषधी वनस्पती लागवड करण्याचे नियोजित आहे. यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यालगत 800 हेक्टरवर लागवड नियोजित आहे.