लाहोर – भारतीय संघातील लेग स्पीन गोलंदाज यजुर्वेंद्र चहल आजच्या आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व लेगस्पीनर मुश्ताक अहमद याने चहलचे कौतुक केले आहे.
चहलने पदार्पण केल्यापासून मी त्याची गोलंदाजी पाहात आहे. त्याच्याकडे चेंडूला फ्लाइट देण्याची हिंमत आहे. तो चेंडूला चांगली फिरकी देतो. समोर कोणताही फलंदाज असो तो आपली दिशा व टप्पा त्यानुरुप ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. क्रिकेटच्या गाईडमध्ये गोलंदाजाकडे जे गुण असावेत असे म्हटले आहे ते सर्व चहलकडे आहेत.
त्याच्याकडे उंची नाही त्यामुळे जर त्याने येत्या काळात क्रिझचा योग्य वापर केला तर तो आणखी भेदक वाटेल. त्याची शरिरयष्टी पाहून तो वेगाने चेंडू टाकेल असे वाटत नाही मात्र, त्याच्या फास्टरवन चेंडूवर दांडी गुल झालेले अनेक फलंदाज पाहिले आहेत. त्यामुळे त्याने आपली हीच हुकूमत कायम राखण्याचा प्रयत्न करावा, असेही मुश्ताक याने सांगितले.