पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : होळी सणाच्या दिवशी एफसी रोडवर रस्त्याने जाणाऱ्या लोकांवर पाण्याचे फुगे मारून हुल्लडबाजी करणाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करून हल्लडबाजी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. २४) रोजी इन्स्टाग्राम पेजवर एफसी रोडवरील व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने युनिट-१ चे अधिकारी व कर्मचारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
युनिट -१ कडील अमलदार पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व शशिकांत दरेकर यांनी शिवाजीनगर व डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीतील सीसी टीव्हीची पाहणी करून प्रतीक दत्तात्रय मोरे (वय २१, राहणार कसबा पेठ, पुणे), करण विठ्ठल डावरे (वय १९, रा. कसबा पेठ पुणे) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनी गुन्हा दाखल केला आहे, तसेच अल्पवयीन मुलांचे पालक रंगास्वामी मगअण्णा गौडा (वय ५५, रा. हडपसर पुणे), धोंडीराम मच्छिंद्र आखाडे (वय ४५. रा. कागदीपुरा, कसबा पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम ३,५,१९९(A) प्रमाणे फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, महेश बामगुडे, नीलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अय्याज दड्डिकर, महेश सरतापे यांच्या पथकाने केली.