सातारा – मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तब्बल पाच वर्षापासून फरारी असलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. येथील राहुल विष्णु शिंदे (वय 23, रा. मल्हार पेठ, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई सातारा शहरातील ग्रीन सिटी अपार्टमेंट येथे करण्यात आली.
यासंदर्भातील अधिक माहिती अशी एप्रिल 2015 ते 9 सप्टेंबर 2017 यादरम्यान फिर्यादी मयुरेश तानवडे (रा. कृष्णानगर) यांनी व्याजाने घेतलेल्या रकमेचे व्याज वसूल करण्यासाठी महेंद्र तपासे आणि त्याच्या सहा साथीदारांनी 2017 रोजी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना धमकावून धक्काबुक्की केली होती. त्यांच्या इनोव्हा कारमधील 15 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यातील महेंद्र तपासे याला अटक करण्यात आली होती.
परंतु, त्याचे साथीदार मात्र फरारी होते. या फरारी साथीदारांमध्ये राहुल शिंदे याचा समावशे होता. या गुन्ह्यातील संशयितांविरोधात खंडणी, दरोडा, गर्दी मारामारी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 199 च्या कलमाप्रमाणे कारवाई (मोका) करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता.
या प्रस्तावाला 14 ऑक्टोबर 2017 रोजी मंजुरी प्राप्त झाली. या मोक्यातील संशयित राहुल विष्णु शिंदे काल गुरुवार दि. 13 रोजी साताऱ्यातील ग्रीन सिटी अपार्टमेंट येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार अमित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इमारतीच्या परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईत पोलिस हवालदार संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे, निलेश काटकर, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव यांनी भाग घेतला.