पुणे – पीएमपीने जिल्ह्यातील विविध मार्गांवर बससेवा सुरू केली. मात्र, या सेवेवर एसटी प्रशासनाने हरकत घेतली आहे. याबाबत एसटीने पीएमपीएएमएलला पत्र पाठवले आहे. पीएमपीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह डिसेंबरपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत बससेवा सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात 12 मार्ग आणि मागील आठवड्यापासून सुमारे 7 मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. तर येत्या काळात लव्हार्डे, मंचर या मार्गांवर सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. या सेवेला एसटीने हरकत घेतली आहे.
पीएमपीला महापालिका हद्द आणि हद्दीबाहेर सुमारे 20 किलोमीटरपर्यंतची सेवा देण्याची मुभा आहे. मात्र, पीएमपीने सुमारे 40 हून अधिक किलोमीटरच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर सेवा सुरू केली आहे. या प्रकारची सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक असते.
परंतु, प्रशासनाने “एनओसी’ घेतली नसल्याचे सांगत एसटीने हरकत घेतली आहे. त्यामुळे या सेवा बंद करण्याबाबत एसटीने पीएमपीला पत्र दिले आहे. तर, “20 किलोमीटरबाबतचा नियम संचलनाबाबतचा नसून, कराबाबत आहे,’ असे पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, यामुळे आता दोन्ही परिवहन विभागांत नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पीएमआरडीए हद्दीत पीएमपी सेवा सर्वांसाठी सोयीची आहे. रा.प. महामंडळाचे पत्र मिळाले असून, पीएमपीने सविस्तर माहितीही त्यांना दिली. जिल्ह्यात सेवा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. तर रा.प. महामंडळाचा समावेश असणाऱ्या “पुम्टा’च्या बैठकीतही “पीएमआरडीए’ हद्दीत सेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यादरम्यान महामंडळाने आक्षेप घेतला नव्हता.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी