वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच अंतिम वर्ष परीक्षा नियोजन विस्कळीत
विद्यापीठाकडून तांत्रिक विषयांवर अद्याप निर्णय नाही
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा यावर्षी मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबलेटवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइलवरून परीक्षा देताना फ्रन्ट कॅमेरा अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षेतील तांत्रिक विषयांवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन विस्कळीत होणार असल्याची चिन्हे आहेत.
पुणे विद्यापीठाने प्रथम वर्षाची 30 मार्चपासून, तर द्वितीय ते अंतिम वर्षापर्यंतची प्रथम सत्र परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाइनद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, ही परीक्षा मोबाइल, लॅपटॉपवर अथवा महाविद्यालयांमध्ये होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये परिपत्रक काढून जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. अद्यापही तसे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
तथापि, यावर्षीच्या परीक्षा मोबाइल, लॅपटॉप, संगणकावर होणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. करोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धत आवश्यक केले आहे.
या पद्धतीमुळे परीक्षा देताना विद्यार्थ्यांना लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्यातून गैरप्रकार होणार नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय उपसमितीची दुसरी बैठक पुढच्या एक दोन दिवसांत होणार आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर परीक्षेबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे.
अद्यापही एजन्सीविषयी अनिश्चितता
विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीची मुदत एका वर्षाची आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची 70 पैकी 20 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना एका कागदावर प्रश्नांची उत्तरे लिहून त्याचा फोटो काढून, त्याचा क्युआर कोड अपलोड करायचा आहे. ही सर्व प्रक्रिया पदवीच्या विद्यार्थ्यांना करणे शक्य आहे, असा प्रश्न आहे. मागच्या परीक्षेसाठी असलेली की नवे एजन्सी परीक्षा घेणार, याविषयी सद्य:स्थितीत काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे परीक्षेचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यास विलंब होणार आहे.