नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मीना हॅरिस यांनी ट्वीट केले होते. भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचेही मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर व्हाईट हाऊसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मीना हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाची आहेत.
अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकन राष्ट्रपती कार्यालयाने मीना हॅरिस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या वैयक्तिक मतांसाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नावाचा वापर करु नये अशीही सूचना दिल्याचे या वृत्तपत्राने नमूद केले आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर जगभरातून अनेक महत्वाच्या व्यक्तींनी भाष्य केले होते. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनीही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. केवळ एकढ्यावरच त्या थांबल्या नव्हत्या तर त्यांनी भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले होते.
कमला हॅरिस यांची भाची असल्याने मीना यांच्या या मताला महत्व प्राप्त झाले होते. मीना हॅरिस यांचे मत हे कमला हॅरिस यांचे आहे का असाही प्रश्न विचारला जात होता. अमेरिकेचे राष्ट्रपती कार्यालय मीना हॅरिस यांच्या या मताशी सहमत नसल्याचे समजतंय. तसेच कार्यालयाने मीना हॅरिस यांना कमला हॅरिस यांच्या नावाचा वापर करु नये असेही सांगितल्याची चर्चा आहे.
दरम्यान, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करताना मीना हॅरिस म्हणाल्या होत्या की, “हा काही योगायोग नाही की जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर महिन्यापूर्वी हल्ला करण्यात आला होता आणि आता जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत. यावरुन आपण क्रोधीत व्हायला हवं.