पोराच्या जीवाची भीती, कारकीर्द बरबाद करण्याचे षड्‌यंत्र; कुटुंबीयांची भावना

– मिथिलेश जोशी

पुणे – दिल्ली पोलिसांचे एक पथक शंतनू मुळूक याचा शोध घेण्यासाठी चार दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत. त्याच्या घराची या पोलिसांनी कसून झडती धेतली आहे. सोमवारी त्याच्या वडिलांना सोबत घेऊन त्यांचे बॅंक स्टेटमेंटही पोलिसांनी ताब्यात धेतले. शेतकरी आंदोलनाचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्यामुळे खवळलेल्या सरकारने या लहान तरुणांची कारकीर्द उद्‌ध्वस्त करण्याचे षड्‌यंत्र रचले आहे. अशी भावना मुळूक यांच्या कुटुंबीयांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.

शंतनू मुळूक आणि उच्च न्यायालयातील वकील निकीता जेकब यांच्यावर अटक वॉरंट काढल्याचे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्‍त्याने पत्रकारांना सांगितले. त्यानंतर दिशा रवी सह या तिघांनी मिळून देशाची प्रतिमा मलीन करण्याचा कट रचला असल्याचे पोलीस सहआयुक्‍तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

या पार्श्‍वभूमीवर बीडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मुळूक कुटुंबीयांची संवाद साधण्याचा प्रयत्न दैनिक प्रभातने केला. त्यांचे चुलतभाऊ सतीश मुळूक म्हणाले, चार दिवसांपासून दिल्ली पोलिसांचे पथक आमच्या घरात आहे. त्यांचे जे हवे ते देण्यास आम्ही तयार आहोत. त्यांच्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करीत आहोत. त्यांना जी माहिती हवी ती आम्ही देत आहोत. शंतनू कोठे भेटेल याची आम्हाला चिंता आहे.

शंतनूचा स्वभाव काळजी करणारा आहे. सरकारने आपल्या विरुद्ध रचलेल्या षड्‌यंत्रामुळे तो जीवाचे बरेवाईट करून घेईल का, अशी आम्हाला भीती वाटत आहे. तो पर्यावरण चळवळीत काम करीत असे. त्याव्यतिरिक्त तो अन्य कोणाबरोबरही संबंधित असावा, असे आम्हाला वाटत नाही.

बीड सारख्या मागास भागातून येऊन त्याने अमेरिकेतून एम.ई. (मॅकेनिकल) ही पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर काही दिवस तो पुण्यात आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत होता. लॉकडाऊन संपल्यानंतर तो पुण्याला गेला होता. आम्ही त्याच्या संपर्काचा आणि शोधाचा प्रयत्न करीत आहोत. मात्र तो होत नाही. तो झाल्यास आम्हीच त्याला दिल्ली पोलिसांपुढे हजर करू, असे मुळूक यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.