पॅरिस – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अपेक्षेप्रमाणे विजय मिळवत थाटात प्रारंभ केला.
जोकोवीचने पहिल्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या नवोदित टेनी सॅण्डग्रेनवर 6-2, 6-4, 6-2 अशी सरळ तीन सेटमध्ये मात करत दुसरी फेरी गाठली. लाल मातीचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा राफेल नदाल आणि ऑस्ट्रेलियाची अग्रमानांकित ऍश्ले बार्टी यांनी एकेरीची दुसरी फेरी गाठली.
पुरुष एकेरीत नदालने ऍलेक्सी पोपीरीनला 6-3, 6-2, 7-6 (7-3) असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. सर्वाधिक 13 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या नदालचा हा फ्रेंच स्पर्धेतील 101 वा विजय ठरला. दुसऱ्या फेरीत नदालचा रिचर्ड गॅस्क्वेटशी सामना होईल. अन्य लढतींमध्ये श्वात्झमनने लू येन शूनवर 6-2, 6-2, 6-3 अशी मात केली. जॉन इस्नरने सॅम क्वेरीवर 7-6 (7-2), 6-2, 6-4 असा विजय मिळवला. मरिन चिलिचने आर्थर रिंडरवर 7-6 (8-6), 6-1, 6-2 अशी मात केली.
जागतिक महिला क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या बार्टीने बर्नार्डा पेराला 6-4, 3-6, 6-2 असे तीन सेटमध्ये पराभूत केले. सेरेनाचा पुढील फेरीत मिहेला बुझार्नेस्कूशी सामना होईल. जपानच्या नाओमी ओसाकाने माघार घेतल्यामुळे बार्टी आणि सेरेना यांच्यापुढील आव्हान तुलनेने सोपे झाले आहे.
बोपण्णा-फ्रॅंको यांचा विजयी प्रारंभ
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियाचा साथीदार फ्रॅंको स्कूगोर यांनी पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. बोपण्णा-फ्रॅंको यांनी निकोलोझ बॅसिलाव्हिली आणि आंद्रे बेगमन यांना 6-4, 6-2 असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत त्यांच्यासमोर अमेरिकेचा निकोल्स मन्रो आणि फ्रान्सेस टिआफो यांचे आव्हान असेल.