पॅराशूट तेलाचा अपलोड व्हिडिओ हटवण्याच्या निर्देशांना स्थगिती
वादग्रस्त व्हिडिओ ब्लॉगरमध्ये बदल करण्याचे निर्देश
मुंबई: अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे एखाद्याच्या प्रतिष्ठेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मात्र, सोशल मीडियावर मांडलेल्या मताबाबत जनमानस प्रभावित होत असेल तर त्या मतांनाही विश्वासाचे बंधन असायला हवे, असे स्पष्ट करत व्हिडिओ ब्लॉगर असलेल्या अभिजीत भंसाली यांना हायकोर्टाने दिलासा दिला. यु-ट्यूबवर पॅराशूट तेलाबाबत टाकलेली व्हिडिओ पोस्ट हटवण्याच्या आदेशांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती देताना त्या पोस्टमध्ये दोन आठवड्यांत काही बदल करण्याचे निर्देश दिले.
व्हिडिओ ब्लॉगर असलेल्या अभिजित भंसाली यांनी यु-ट्यूबवर पोस्ट पॅराशुट खोबरेल तेलाविरोधात टीकात्मक, विरोधाभास दाखवणारा व्हिडीओ अपलोड करून इतर तेल आणि पॅराशुट तेलाची तुलना केली.त्यात दोन्ही तेलाच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवून त्यांच्या शुद्धतेची आणि रंगातील बदलाची तुलना केली. तसेच व्हिडीओतून त्याने पॅराशुट तेल केस, त्वचा आणि इतर वापरासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.
या विरोधात मारीको कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून व्हिडिओतून कंपनीच्या उत्पादनाविरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप केला. तसेच यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे तो व्हिडीओ काढून टाकण्याची मागणी केली. याची दखल घेत एकसदस्य न्यायालयाने भंसाळी यांना व्हिडिओ मागे घेण्याचे निर्देश दिले. त्या विरोधात भंसाली यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. यावर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.