पुणे – परदेशी चलन खरेदीसाठी नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. प्राथमिक माहितीनुसार 35 ते 40 जणांची यामध्ये फसवणूक करण्यात आली. यामध्ये भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीची 47 लाख रुपयांची फसवणूक झाली.
अभिजीत संजय कुलकर्णी व त्याची पत्नी (दोघेही रा. नारायण पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पाषाण येथे राहणाऱ्या एका 53 वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. कुलकर्णी दाम्पत्याची वेल्थप्लॅनेट नावाची कंपनी आहे. त्याद्वारे त्यांनी 2018 पासून नागरिकांना विदेशी चलनाच्या ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास एका वर्षांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले.
तक्रारदार शुभांगी यांनी त्यावर विश्वास ठेवत वेल्थ प्लॅनेट कंपनीत 48 लाख 92 हजार रुपये गुंतविले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी कुलकर्णी यांना पैसे मागितले असता एक लाख 62 हजारांचा परतावा कंपनीकडून त्यांना देण्यात आला. उर्वरित 47 लाख 30 हजार रुपये मात्र कंपनीने न देता त्यांची फसवणूक केली. यामध्ये आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून अशाप्रकारे काही कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये 35 ते 40 नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत असून पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे करत आहेत.