पुणे – सॉफ्टवेअर कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 43 हजार 750 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
सुरेंद्र जोशी (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ऑनलाइन संकेतस्थळावरून फिर्यादी यांची माहिती घेत आरोपींनी कॉल केला. तसेच एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीशी संबंध नसताना कंपनीचा लोगो, कामगार यांच्या नावाचा गैरवापर करून सदर कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. तसेच, फिर्यादिना ऑनलाइन माध्यमातून 43 हजार 750 रुपये घेत नोकरी न मिळून देत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षण किरण बालवडकर हे करीत आहेत.