नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Union Home Minister Amit Shah discharged from AIIMS, Delhi. He was admitted here on August 18 for post-COVID care: Government Sources
(file pic) pic.twitter.com/cfzxVECuxU— ANI (@ANI) August 31, 2020
दरम्यान, याआधीही 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्स रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले होते की, अमित शाह यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मागील तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते रुग्णालयातूनच आपले काम करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड-19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.”