नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर मागच्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत येत आहे.देशाचा नकाशा चुकवल्या प्रकरणी अगोदरच सरकारच्या रडारवर असणाऱ्या ट्विटरने अचानक आणखी एक चूक केली. ट्विटरवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अचानक गायब झाला. यानंतर ट्विटरने प्रतिक्रिया दिली आहे. अनावधनाने ही चूक झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरने दिली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “त्रुटीमुळे ग्लोबल कॉपीराईट पॉलिसी अंतर्गत ट्विटर तात्पुरते लॉक करावे लागले होते. तातडीने दुरुस्ती केली असून अकाऊंट आता पूर्ववत झाले आहे.”
‘कॉपीराइट होल्डरच्या रिपोर्ट’नुसार अमित शाह याचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काढला होता. ट्विटरवर त्यांचे 23.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर ब्लँक पेजसह “मीडिया नॉट डिस्प्लेड. कॉपीराईट होल्डरच्या अहवालानुसार हा फोटो हटवण्यात आला आहे.” मात्र यानंतर अमित शाह यांचा फोटो पुन्हा लावण्यात आला. परंतु ट्विटरने याबाबत आणखी माहिती शेअर केलेली नाही.
भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहित तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला नोटीस बजावून उत्तर देण्यासाठी पाच दिवसांचा अवधी दिला आहे. त्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला ट्विटरवरुन अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अनावधनाने ब्लॉक झाल्याची घटना घडली.