नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील सुगंधी शहर कन्नौज येथे उत्पादित करण्यात आलेल्या परफ्युमचे अनावरण अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधील भाराताचे वाणिज्यदूत रणधीर जैस्वाल यांच्या हस्ते या मेड इन इंडिया अत्तराचे अनावरण करण्यात आले. लवंग, वेलदोडा, जायफळ अशा मसाल्यांच्या पदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेले हे अत्तर व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्त बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जैस्वाल म्हणाले की, कदाचित अमेरिकेत पहिल्यांदाच भारतात तयार करण्यात आलेले आणि ते देखील कन्नौजमध्ये तयार करण्यात आलेले अत्तर प्रथमच उपलब्ध झाले असेल. पुन्हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेला 75 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय अत्तर अमेरिकेत उपलब्ध होणे ही देखील एक ऐतिहासिक गोष्ट आहे. उद्योजक विकास खन्ना यांच्या झिग्राना कंपनीने हे अत्तर उत्पादित केले आहे. या कार्यक्रमात झिग्रानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील पाठक-शर्मा म्हणाल्या की, भारताताली उत्पादनाचे न्यूयॉर्कमध्ये लॉचिंग होणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कन्नौज आणि भारताला जागतिक व्यासपीठावर सादर करणे ही आनंदाची बाब आहे.
या अत्तरामध्ये लवंग, वेलदोडा, जायफळ, चंदन, चमेली, गुलाब यांच्या अर्काचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. शुद्ध गुलाब तेलाचे वापर या अत्तरासाठी करण्यात आला आहे. गुलाबाचे वीस ग्रॅम तेल मिळवण्यासाठी शंभर किलो गुलाबाची गरज भासते, अशी माहिती त्यांनी दिली. भारतात अशा नैसर्गिक सुगंधापासून अत्तरे बनवण्याची प्राचीन काळापासून परंपरा आहे. त्यामुळेच सुगंधी शहर कन्नौजला समर्पित आणखी एक अत्तर सादर करण्याची कंपनीची इच्छा आहे, असे पाठक-शर्मा यांनी सांगितले. झिग्रानाच्या मूळ कंपनीचा 1911 पासून अत्तरे बनवण्याचा इतिहास आहे.