हडपसर(प्रतिनिधी)- रामटेकडी येथील पाण्याच्या टाकीतून सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीत पाणी येणार आहे. त्यासाठी पाण्याची लाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, वन विभागाच्या जागेतील काम रखडले होते. त्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार करून हा अडथळा दूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नवीन लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लवकरच याभागातील तसेच नव्याने जोडलेल्या काही भागातही येथून मुबलक पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली आहे.
24 बाय 7 योजने अंतर्गत नव्याने टाकण्यात येणाऱ्या या पाण्याच्या लाईनमुळे या भागात तसेच नवीन प्रभाग क्रमांक 44 व 46 मधील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल ,असा विश्वास नगरसेवक नाना भानगिरे यांनी व्यक्त केला आहे. भानगिरे यांच्या हस्ते 24 X 7 अंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ केला त्यावेळी ते बोलत होते.
“रामटेकडी येथील टाकीपासून ते या भागाकडे येणाऱ्या लाईनमध्ये वन खात्याची झाडे व पाईपलाईन मध्ये येत होती. त्यामुळे काम करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर वन अधिकाऱ्यांना योग्य त्या कागद पत्रांची पूर्तता करून काम करू देण्याची विनंती केली आणि आता सदर ठिकाणचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पुरेसा दाबाने व नियमित पाणी मिळेल.
– प्रमोदनाना भानगिरे (नगरसेवक)
काळेपडळ परिसर तसेच हांडेवाडी रस्त्यावरील रवी पार्क, नवरत्न एगजोटीका, मयूर जेमिनी, वैष्णवी नगर, चिंतामणी नगर, सातव नगर, दुगड चाळ, श्रीराम चौक गुलामअली नगर आणि जवळपास सर्वच परिसरात नियमित आणि पुरेसे पाणी यामुळे मिळणार आहे.