नवी मुंबई – मुळ दिल्लीचे असलेल्या आणि सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब तळोजा येथील शिवकॅनर बिल्डींगमध्ये राहत होते. पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट मिळाली असून याचा अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजामधील संबंधित इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका बेडरुममध्ये 4 मृतदेह सापडले. यात साधारण 35 वर्षे वय असलेला युवक, 30 वर्षे वय असलेली महिला आणि अनुक्रमे 7 व 8 वर्षांचा मुलगा व मुलगी यांचा समावेश आहे. संबंधित युवकाचा मृतदेह डोकं अडकलेल्या अवस्थेत आणि धड खाली पडलेल्या अवस्थेत सापडला. घर मालकांनी स्वतः बाहेरुन दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, हे कुटुंब सप्टेंबर 2019 मध्ये तळोजा येथे राहण्यास आले. यानंतर काही महिन्यांमध्येच कुटुंबाने सामूहिक आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांना घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण स्वतःहून ही आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणात सर्व शक्यता तपासत आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह पनवेल जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतरच आत्महत्येमागील मुळ कारणं समोर येणार आहेत. तळोजा पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.