पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने डीएसके यांच्या बोगस कंपनीचे धनादेश प्रदान करून ठेवीदारांची फसवणूक केली, असा आरोप डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी केला आहे.
बँकेकडे डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या १,१५३ कोटी रुपयांच्या रकमेची मागणी त्यांनी नोटीसद्वारे केली आहे. जर बँकेने १५ दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर बँकेविरुद्ध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार केली जाईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. दरम्यान, बँकेने बिडकर यांचा दावा फेटाळला आहे. डीएसके यांनी दिलेल्या धनादेशाबद्दल कल्पना नाही. त्यामुळे अशी नोटीस पुन्हा पाठवू नका असे उत्तर बँकेने दिले आहे.
बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करून डीएसके यांना धनादेश जारी केले आणि त्यामुळे ठेवीधारकांनी डीएसके समुहामध्ये गुंतवलेले पैसे गमावले, असा दावा डीएसके ग्रुपच्या २४५ ठेवीधारकांच्या वतीने अॅड. बिडकर यांनी केला आहे.
या नोटीसला बँकेकडून उत्तर देण्यात आले आहे. या नोटीसमध्ये कोणतीही सत्यता नाही. निव्वळ चुकीच्या आधारावर् वैयक्तिक हेतूने बँकेची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आलेली आहे.
बँकिंग हा एक व्यवसाय असून, यात बँकेकडून ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या जातात आणि ग्राहकांना कर्ज दिली जातात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक खातेधारकाला धनादेश पुस्तिका दिली जाते खातेधारकावर बँकेचे नियंत्रण नसते. डीएसके यांनी कोणत्या हेतूने नमूद व्यक्तींना धनादेश दिले याची कल्पना नाही. त्यामुळे नोटीसला कोणताही आधार नसल्याचे बॅंकेने म्हटले आहे.