मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश
शहरातील मृतांची संख्या 46 वर
पुणे – शहरात करोनाच्या मृत्यूचा कहर सुरूच असून मागील आठ दिवसांपासून दररोज 3 ते 4 जणांचा मृत्यू होत आहे. गुरुवारीही (दि.16) दिवसभरात 2 जणांचा बळी गेला असून, बुधवारी (दि.15) रात्री उशिरा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 46 वर जावून पोहोचली आहे.
तिघाही मृतांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. वाकडेवाडी येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेला 3 एप्रिलला त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी (दि.15) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर गुरुवारी दिवसभरात गंजपेठ परिसरात राहणारे 54 वर्षीय पुरुष आणि कोंढवा परिसरातच राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांनाही मधुमेहाचा आजार होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मागील 48 तासांत आणखीन 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गुलटेकडी येथील एका 55 वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.
दिवसात 65 बाधित
दरम्यान, शहरात गुरुवारी एका दिवसात तब्बल 65 जण नवे बाधित आढळले. शहरात एका दिवसात नवे बाधित आढळण्याचा हा उच्चांक असल्याने भीती व्यक्त होत आहे. लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.