मुंबई – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वतःच त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर करेल, त्याच्यावर विनाकारण दडपण टाकू नये, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत सगळेच चर्चा करत आहेत. तो महान क्रिकेटपटू आहे. आपल्या भविष्यातील घडामोडींबाबत तो त्याचा निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे. आज भारतीय संघाकडे धोनीचा पर्याय नाही. त्याच्याकडे अद्याप एक-दोन वर्षाचे क्रिकेट शिल्लक आहे असा मला विश्वास आहे. पण सातत्याने असे दडपण टाकले गेले व त्याला कंटाळून त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला व एकदा संघाबाहेर गेला तर तो परत येणार नाही, असेही हुसेन यांनी स्पष्ट केले.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत पराभव झाल्यानंतर धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यानंतर निवड समितीनेही त्याच्याशी चर्चा करत त्याला आपली कामगिरी व तंदुरुस्ती सिद्ध करण्याचा सल्ला दिला होता. धोनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) आपल्या चेन्नई सुपरकिंग संघाद्वारे क्रिकेटमध्ये परतण्याचे ठरवत संघाच्या सराव सत्रात सहभागीही झाला होता. मात्र, त्याचवेळी चीनकडून जगभरात पसरेल्या करोना विषाणूंच्या धोक्याने 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल पुढे ढकलण्यात आली व 15 एप्रिलपासून सुरु होण्याचे जाहीर करण्यात आले. सध्या करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने 14 एप्रिलपर्यंत लावण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन येत्या 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने ही स्पर्धा कधी होणार याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत धोनी भारतीय संघात कधी व कसे पुनरागमन करेल याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
क्रिकेटचे जाणकार धोनीचा सुवर्णकाळ संपल्याचे म्हणत असले तरीही त्याच्याकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे. कोणीही त्याच्यावर दडपण टाकू नये. त्याच्या कारकीर्दीचा निर्णय घेण्यास त्याला मोकळीक द्या. एकदा त्याने निवृत्ती जाहीर केली की तो पुन्हा संघात दिसणार नाही, असेही हुसेन यांनी सांगितले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील धोनीने आयपीएलमध्ये कामगिरी सिद्ध करावी तरच निवड समिती त्याच्या संघातील स्थानाबाबत विचार करेल असे संकेत दिले होते.