राजगुरुनगर -खेड तालुक्यात बुधवारी (दि. 27) नव्याने 4 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19 झाली आहे. आतापर्यंत तालुक्यातील एकूण 78 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 19 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
पैकी राक्षेवाडीमधील आढळलेले पहिले तीन रुग्ण बरे होऊन घरी आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यातील मंगळवारी (दि. 26) एक दिवसात सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईवरून गावी आलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून करोना पसरल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
वडगांव पाटोळे येथील बाधित व्यक्ती मुंबईहून गावी आला त्यानंतर त्याला त्रास झाल्याने त्याची स्वॅब टेस्ट केली त्यात तो पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मुंबईवरून ते ज्या गाडीने आले त्या गाडीच्या पाईट येथील चालकाला आज करोना झाल्याचा अहवाल आला आहे. तर पापळवाडी येथे परवा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दोघा संशयितांचा मृत्यू
खेड तालुक्यातील पापळवाडी येथील एका संशयिताला स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते; मात्र तो टेस्ट होण्यापूर्वीच मरण पावल्याने गावात खळबळ उडाली आहे. तर वाडा येथील एक 25 वर्षीय युवक मुंबईहून गावी आला होता. त्याला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.