विनोद पोळ
कवठे –वाई तालुक्यातील कवठे येथील राजेंद्र धर्माजी पोळ यांची सुकन्या पूजा व रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील बेदिल उत्तमराव माने यांचे चिरंजीव अनेकत यांचा विवाह चार महिन्यांपूर्वी निश्चित झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेले करोनाचे संकट लक्षात घेऊन साध्या पद्धतीने लग्न समारंभ उरकून वधू पक्षाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रुपयांची तर वर पक्षाकडून रहिमतपूर पालिकेला 15 हजार रुपयांची मदत करत समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
कवठे येथील पूजा धर्माजी पोळ आणि रहिमतपूर येथील अनिकेत बेदिल माने यांचा विवाह चार महिन्यांपूर्वी निश्चित झाला होता. पूजा व अनिकेत यांचा सारखपान सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला होता. लग्नसोहळादेखील अशाच धुमधडाक्यात करण्याचे नियोजन होते. मात्र, जगभर थैमान घातलेल्या करोनाचे संकट आपल्या देशावरही आले आणि बघता बघता हे संकट देशभरासह महाराष्ट्रात तसेच सातारा जिल्ह्यातही गडद होत चालले आहे. ही बाब लक्षात घेऊन या पोळ व माने कुटुंबियांना हा लग्नसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले. तसेच लग्नसमारंभावरील अनावश्यक खर्च टाळून करोनाशी लढत असलेल्या प्रशासनाला मदत करण्याचा निर्णयदेखील दोन्ही पक्ष्यांनी घेतला.
कवठे येथे वधूच्या घरासमोरच मंडप घालून अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा सोशल डिस्टंन्सच्या नियमांचे पालन करत नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहू शकले असते. मात्र कोणासही निमंत्रण देण्यात आले नव्हते. ठरविल्याप्रमाणे वधु पक्षाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रुपये तर वर पक्षाकडून 15 हजार रुपये रहिमतपूर नगरपालिकेसाठी देण्यात आले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीची रक्कम सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आणि रहिमतपूर नगरपालिकेसाठी वरपक्षाकडून 15 हजार रुपयांचा निधी हा रहिमतपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी आ. मकरंद पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूरच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, नगरसेवक नीलेश माने, विनायक पाटील, अविनाश माने, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, कवठे गावाचे सरपंच श्रीकांत वीर यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थिती होती. दरम्यान, नवरी मुलीचा भाऊ प्रसन्न हा नेव्हीमध्ये असल्याने तसेच चुलता व चुलती गोवा राज्यात असल्याने वधूमाता व पित्याशिवाय या लग्नाला कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते तसेच नवऱ्यामुलाची सख्खी बहिणही या विवाहास उपस्थित नव्हती.