मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील कहडणे परिवारातील एकाच कुटुंबातील चार सदस्य वैद्यकीय आणि पोलीस क्षेत्रात कार्यरत असून, ते करोना योद्धा म्हणून जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. कळंब येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुहास कहडणे हे मंचर येथे होमिओपॅथी औषधोपचार करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयात खासगी डॉक्टरांच्या वतीने फ्ल्यू क्लिनिक संकल्पना त्यांनी राबवली आहे.
भीमाशंकर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची त्यांच्या वस्तीवर जाऊन तपासणी करण्याचे काम त्यांनी केले. सहकारी डॉक्टरांच्या मदतीने मंचर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणीही त्यांनी केली आहे. आयुष मंत्रालयाने सूचित केलेल्या आर्सेनिक अल्बम-30 या औषधांचा प्रचार व प्रसार ते करीत आहेत.
त्यांनी मंचर, घोडेगावातील अनेक अत्यावश्यक सेवेतील कार्यरत व्यक्तींना, तसेच निराधार बालकाश्रमात करोनाविषयी मार्गदर्शन करून होमिओपॅथिक औषधाचे वाटप केले आहे. डॉ. प्रतिभा कहडणे या उपजिल्हा रुग्णालयात होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ओपीडी सेवा रुग्णांना देत असून, इतर रुग्ण सेवा मिळून देण्यासाठी मदत करीत आहेत.
सुदर्शन कहडणे हे पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालयात पोलीस नियंत्रण कक्ष बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत, तर दीपाली कहडणे या पोलीस हवालदार या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) येथे कार्यरत आहेत. त्यांनी करोना बंदोबस्त नियोजनकामी आळेफाटा पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे कर्तव्य बजावले आहे. सध्या त्या गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी स्वतःच्या मुलाला घरापासून लांब मावशीकडे खबरदारी म्हणून ठेवले आहे. कहडणे कुटुंबातील चारही सदस्य करोनाच्या पार्श्वभूमीवर अखंड सेवा देत असल्याने कळंबकरांसाठी हा अभिमानाचा विषय आहे.