पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना परिस्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी धडधडीत खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची पालिकेत शंभर टक्के उपस्थिती असल्याचे सांगत तब्बल तीन शिफ्टमध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात महापालिकेत शहरातील 71 कंटेन्मेंट झोनचा विचार 30 ते 40 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून येत असतानाही आयुक्तांनी महापालिकेत शंभर टक्के उपस्थिती असल्याचे खोटे सांगण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जगताप डेअरी (साई चौक) येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने उभारलेल्या पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) करण्यात आले. मात्र उद्घाटनापूर्वी अजित पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवड महापालिका गाठली. आणि शहरात “करोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अजित पवार यांना वरीमाहिती दिली. सुरुवातीला “वॉररुम’मधील माहिती घेतल्यानंतर आयुक्तांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अजित पवार आले. यावेळी त्यांनी आयुक्तांशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पवारांनी आयुक्तांना प्रश्न विचारला. यावेळी आयुक्तांनी थेट खोटे उत्तर देत कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती असल्याचे सांगितले. काही कर्मचारी सकाळी आठ वाजता येत असून, काहीजण दुपारी 12 वाजता तर काहीजण 2 वाजता येत आहेत. सकाळी 8 ते 2, दुपारी 12 ते 6 आणि 2 ते 8 कर्मचारी कामावर येत आहेत. सर्वच्या सर्व कर्मचारी कामावर हजर असून, गरजेनुसार तीन शिफ्टमध्ये नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. वस्तुत: शहरात 71 कंटेनमेंट झोन आहेत. या झोनमध्ये महापालिकेचे शेकडो कर्मचारी रहात आहेत. या झोनमधून बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे हे कर्मचारी महापालिकेकडे फिरकतही नसतानाही आयुक्तांनी मात्र शंभर टक्के उपस्थितीचा दावा केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजेंद्र वाबळेंनी आयुक्तांना ठरविले खोटे
करोना संशयीतांच्या घशातील स्वॅबच्या तपासणीला उशीर होत असून तीन ते चार दिवसानंतर आपल्याला अहवाल येत असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अजित पवार यांना दिली. मात्र यामध्ये दुरुस्ती करत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांनी आयुक्तांना खोटे ठरवित तीन ते चार दिवस नाही तर दोन दिवसांमध्येच आपल्याला अहवाल प्राप्त होत असल्याचे अजित पवारांना सांगितले. त्यामुळे आयुक्तांचा खोटेपणा या ठिकाणीही उघड झाला.
शासनाकडून अतिरिक्त
तपासणीची सुविधा देणार
पिंपरी-चिंचवड शहरातील संशयितांचे तपासणी अहवाल चार ते पाच दिवसानंतर येत असल्याची आवई ठोकत महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने करोना चाचणी करण्यासाठी खासगी लॅबची मदत घेण्याचे नियोजन केले आहे. स्थायी समितीने याला मान्यताही दिली आहे. ही माहिती आयुक्तांनी अजित पवार यांनी दिली. यावर अजित पवार यांनी ससून, एनआयव्ही आणि नारीकडून किती आणि कशा पद्धतीने तपासणी अहवाल उपलब्ध होत असल्याची माहिती घेतली. यावर खासगीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला दाद न देता राज्य शासनाकडून मोफत स्वरुपात करोना चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वत: लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून देतो, असे आयुक्तांना सांगितले. यानंतरही खासगी तपासणीचा मुद्दा आयुक्तांनी लावून धरला मात्र त्यावर अजित पवारांनी दूर्लक्ष करत शासनाकडून तपासणीसाठी करण्याबाबतच भर दिला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंडावर बोट
महापालिका आयुक्त उपमुख्यमंत्र्यांना माहिती देत असताना त्यांच्या शेजारी आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह काही निवडक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त चुकीची व खोटी माहिती देत असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आयुक्तांना विरोध करण्याची अथवा अजित पवारांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून देण्याची काळजी घेतली नाही. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते आयुक्तांना का भितात? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
पालिका प्रशासनाची भंबेरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणालाही काहीही न कळविताच दहा वाजता पिंपरी-चिंचवड महापालिका गाठली. ठराविक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याची कल्पना होती. इतरांना कल्पना देण्यात आली नव्हती. अचानक अजित पवार महापालिकेत प्रगट झाल्याने अनेकांची भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले.