चार लाखांचा धनादेश मृताच्या वारसांना सुपूर्द

राजगुरूनगर – चिंचोशी (ता. खेड) येथे दोन महिन्यांपूर्वी अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या नातेवाईकांना व दोन जखमींना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आर्थिक मदतीचे धनादेश आमदार सुरेश गोरे व तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) देण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अवघ्या दोन महिन्यांत ही मदत देता आल्याचे समाधान यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले यांनी व्यक्त केले. खेड तालुक्‍यातील चिंचोशी येथे 16 एप्रिल 2019 रोजी अवकाळी पाउस झाला. अवघ्या शंभर मीटर व्यासाच्या भागात हा पाऊस पडला होता. या वादळी वळवाच्या पावसात अंगावर वीज कोसळून येथील हरिदास महादू गोकुळे (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेतात काम करणाऱ्या अंजना हरिदास गोकुळे व रुपाली बाळासाहेब गोकुळे या दोघी जखमी झाल्या होत्या. मृत्युमुखी पडलेल्या हरिदास गोकुळे यांच्या पत्नी व मुलांना नुकसानभरपाई म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच जखमी महिलांना उपचारासाठी झालेल्या खर्चात मदत म्हणून प्रत्येकी 12 हजार 700 रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी तिन्हेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भास्कर जगदाळे, चिंचोशी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. आर्थिक मदत जरी तत्काळ मिळाली असती तरी एका जीव पुन्हा येऊ शकत नाही, अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.