“इव्हीएम’ ऐवजी “बॅलेट’वर मतदान घ्या!

शरद पवार यांची मागणी : मतदान प्रक्रियेवरील संशय लोकशाहीला घातक
पिंपरी – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशभरातील अनेक ठिकाणांहून “इव्हीएम’बाबत संशय व्यक्त होत आहे. मतदान प्रक्रियेवरील हा संशय लोकशाहीसाठी घातक असल्याने मतदान प्रक्रिया “बॅलेट पेपर’वरच झाली पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.

भोसरी येथे विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून “इव्हीएम’बाबत संशयाचे वातावरण आहे. पाच मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आम्ही आता निवडणूक आयोगाकडे आमची मागणी लावून धरणार आहोत. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान हे भाजपाचे नेते म्हणून समोर आले होते. मात्र विरोधी पक्षांकडून पंतप्रधानाचा उमेदवार नसल्याचा फटकाही या निवडणुकीत बसला. लोकांनी मोदींकडे बघून तसेच राष्ट्रीय मुद्यांवर मतदान केले. “इव्हीएम’द्वारे होणाऱ्या मतदानामध्ये पहिली पन्नास मते योग्य पडतात. मात्र त्यानंतरच्या मतदानामध्ये गडबड होत असल्याचा आमचा संशय आहे. यासाठी आम्ही “टेक्‍निकल टीम’चाही “सपोर्ट’ घेणार आहोत. नागरिकांच्या मनात मतदान प्रक्रियेबाबत निर्माण होणारा संशय हा लोकशाहीसाठी घातक असून तो दूर करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे.

पाच विजयी खासदारांना सारखीच मते
उत्तर प्रदेशातील विजयी झालेल्या भाजपाच्या पाच खासदारांना सारखी मते असून पराभूत झालेल्या उमेदवारांनाही सारखी मते आहेत. ही बाबच मुख्यत: खटकणारी आहे. अशा पद्धतीने होवूच शकत नाही. आपण याबाबत उत्तर प्रदेशातील नेत्यांशी चर्चा करणार असून एकसारखी मते विविध मतदारसंघात विजयी आणि पराभूत उमेदवारांना कशी पडू शकतात, असा प्रश्‍नही पवारांनी यावेळी उपस्थित केला.

आठ महिन्यांत इतका बदल अशक्‍य
कॉंग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यातीन विधानसभा निवडणुका अवघ्या 8 महिन्यांपूर्वी जिंकल्या होत्या. अवघ्या आठ महिन्यांत जनतेच्या मतांमध्ये इतका बदला झाला की कॉंग्रेसचा एकही खासदार विजयी झाला नाही, ही बाब न पटणारी आहे. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात इतका मोठा चमत्कार झाल्याचे मी पाहिले नाही.

नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवणार
जग आधुनिकतेची कास धरत असताना आपले पंतप्रधान केदारनाथच्या गुहेत जावून बसतात, हा काय प्रकार आहे. जनतेसमोर आणि युवा पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतो याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रत्येकाला धर्म आहे आणि त्याला त्याचा अभिमान असावा, मात्र सध्या सुरू असलेली धर्मांधता ही देशासाठी घातक आहे. भारताने सर्वधर्म समभावाची विचारधारा स्विकारलेली आहे. काश्‍मिरसारखा मुद्दा संवेदशील असून तो अत्यंत योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

दुष्काळ, पाण्याबाबत राजकारण नको
सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर असून आतापर्यंत पडलेल्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भयानक आहे. राज्यकर्त्यांनी दुष्काळावरू राजकारण करणे अपेक्षित नाही. आम्ही कोणावरही टीका टिपण्णी न करता यातून मार्ग काढण्यासाठी सक्रीय काम करीत आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत आमची आणखी एक बैठक होणार असून सध्या असलेल्या प्रश्‍नांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.

मग दोन वर्षे गप्प का बसलात?
निरा-देवधरचे पाणी इंदापूर, बारामतीला देण्यावरून सध्या राजकारण सुरू आहे. मात्र आम्ही या राजकारणात पडणार नाही. सध्याचे जे पाणी दिले जात आहे, त्याबाबत 2012 साली पाच वर्षांसाठी आदेश देण्यात आला होता. 2017 सालापर्यंत हा आदेश वैध होता. 2017 साली आम्ही सत्तेवर नव्हतो मग गेल्या दोन वर्षांत यांना आज घेतलेला निर्णय घेण्यापासून कोणी रोखले होते. निरा-देवधरवरून आम्ही काय बोललो तर भलतच होईल. 1954 साली मालोजीराव नाईक-निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पाणीवाटप होत आहे. राज्यकर्ते ते आहेत त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यासाठी ते मुक्त आहेत. परंतू राजकारण करू नये इतकेच आम्हाला वाटते. जनता दुष्काळाने होरपळत असून सरकारने जनतेला मदत करण्यासाठी उपाययोजना करण्याला महत्त्व द्यावे.

कारखाने, उद्योगांनी जबाबदारी उचलावी
सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. या प्रसंगी दुष्काळग्रस्तांना मदत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यात शंभरहून अधिक सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांनी चारा छावण्या, टॅंकरची जबाबदारी उचलण्याची गरज आहे. त्याच धर्तीवर राज्यातील मोठ्या उद्योग समुहाने देखील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिल्यास मार्ग निघू शकेल. याबाबत मुख्यमंत्री व उद्योजकांशी आपण चर्चा करून मार्ग काढणार आहोत. सध्या लवकरात लवकर पाऊस पडावा आणि जनतेला दिलासा मिळावा, अशी आपली अपेक्षा असल्याचेही पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.